By Editor on Friday, 20 February 2026
Category: पुणे शहर

[Maharashtra Times]...तर अस्वस्थता आणखी वाढेल; अजितदादांच्या तपासाबाबत भीती व्यक्त करत सुप्रिया सुळेंकडून सरकारकडे मोठी मागणी

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विविध शंका उपस्थित करत तपास यंत्रणेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोनदा या विषयावर सविस्तर पत्रकार परिषद घेत हा घातपात असल्याचा दावा केला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही खासदार सुळे यांनी सरकारकडे केली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबद्दल एक्सवर पोस्ट लिहीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, "आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे," अशी भूमिका सुळे यांनी मांडली आहे. 

रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी

पायलटचा वापर करून अजित पवार यांचा घातपात घडवून आणण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी नुकताच केला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. "व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, रोहित पवार यांच्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही विमान अपघाताच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली असून पारदर्शकपणे तपास करण्याची मागणी केली आहे.

Supriya sule demand transparent investigation into ajit pawar plane accident demand for security for rohit pawar; अजितदादांच्या तपासाबाबत भीती व्यक्त करत सुप्रिया सुळेंकडून सरकारकडे मोठी मागणी | Maharashtra Times

Leave Comments