धोंडे जेवणात जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | जावयाला धोंडे जेवण घातले जाते, यावेळी सासू जावयाचे पाय धुते, अशी प्रथा आहे. मात्र, अशाप्रकारची प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावेत, असा बदल सुळे यांनी सुचवला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये यशस्विनी सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी रोज पाचच मिनिटे रील पाहते, त्यापेक्षा जास्त पाहिले तर रील्स लॉक होण्याची फोनमध्ये सेटिंग आहे. माझी सगळ्यात लाडकी स्टोरी धोंडे जेवण म्हणतात ना त्याची आहे. मला हे कौतुकास्पद वाटते, कारण शिंदेंनी (प्रतिभा पवार यांचे माहेर) कधी पवारांना बोलावले नाही, ना पवारांनी कधी सदानंद सुळेंना बोलावले. मला धोंडे जेवण काय असते, हे माहितच नव्हते, मला धोंडे जेवण कुणामुळे कळले तर रीलमुळे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कोणीतरी मला सांगितले, दर तीन वर्षांनी जावयाला बोलवायचे आणि जावयाचे पाय धुवायचे. म्हटले कशासाठी. तर म्हणाले अशीच पद्धत असते. मी म्हटले, माझ्या लोकसभा मतदारसंघात मी बदल करणार. जरुर धोंडे जेवण करा. माझा त्याला विरोध नाही. पण असे करुया आपण की सासूने त्याचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासूचे आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत. कारण एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिलीत म्हणून.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, घरी जेवायला बोलवा. घरी जेवायला जा. पुरणपोळी करा. काही करा. पण आई वडिलांना पाय धुवायला लावू नका. हे कुठेतरी थांबले पाहिजे. जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी करा. डोक्यावर बसवा. हृदयात ठेवा. धोंडे जेवण हे निमित्त आहे. पण लोकप्रतिनिधी बदल करतो, तेव्हा सर्वांना पटते. यालाच सामाजिक क्रांती म्हणतात, असे सुळे म्हणाल्या.