By newseditor on Monday, 23 April 2018
Category: पुणे शहर

राज्य सरकारच्या योजना फसव्या - सुप्रिया सुळे








महेंद्र बडदे : सोमवार, 23 एप्रिल 2018


राज्य सरकारच्या योजना फसव्या


पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाची हौस जरा जास्तच आहे असा चिमटा काढीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार फसव्या योजना आणत असल्याची टिका केली. टोमॅटोचे भाव गेल्या महिन्याभरापासून उतरले आहे. उत्पादन खर्च भागेल एवढा भावही मिळत नसल्याने कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी आणखी एक आंदोलन केले. शेतमालाला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनास खासदार सुळे यांनी भेट देऊन पाठींबा जाहीर केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांना सोशल मिडीयाची जास्तच हौस असल्याने या आंदोलनाचे फोटो मी स्वत: काढून त्यांना "ट्‌वीट' करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे "इन्स्टाग्राम'नावाचा नवीन "उद्योग' सोशल मिडीयात सुरू झाला आहे, त्यावरही हे फोटो "अपलोड ' करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना सुळे यांनी हमीभावाच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याची चिंता व्यक्त केली

"" ग्रामीण भागात हमीभावाच्या प्रश्‍नावर सातत्याने चर्चा होत आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर हमी भाव कधी मिळणार हा एकच प्रश्‍न विचारला जात आहे. सरसकट कर्जमाफी कधी मिळणार हे विचारले जात आहे. हे सरकार फसव्या योजना आणत आहे. बाजार समितीचे कायदे आपण तयार केले. ते आपणच बदलले पाहिजेत. यापुढे आंदोलन कसे करायचे याविषयी डॉ. आढाव यांनी मार्गदर्शन करावे. आंदोलन तीव्र करायचे म्हणजे शेतमाल रस्त्यावर फेकून द्यायचा नाही. अन्न रस्त्यावर फेकणे आपली संस्कृती नाही.'' असे नमूद करीत सुळे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या कालावधीत सातारा येथे दुधाच्या टॅंकरमधील दुध उत्पादकांनी ओतून दिल्याचे आंदोलन केले होते त्यावेळी अस्वस्थ झाल्याने झोपू शकले नव्हते असे सांगितले

Leave Comments