By newseditor on Tuesday, 27 November 2018
Category: पुणे शहर

जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर-शरद पवार

जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणेघेणे नाही का? असाही प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे.

जनतेच्या प्रश्नांना बगल

लोकसत्ता ऑनलाइन | November 26, 2018 06:38 pm

राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळतो आहे, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. ते करण्याचे सोडून आणि लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत भाजपा आणि शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्येचा प्रश्न समोर आणला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. तसेच रामाच्या मूर्तीची उंची किती असावी? यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याना सविस्तर चर्चा करायची आहे मग जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आहे का? असेही शरद पवारांनी विचारले आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संविधान स्तंभ लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघा च्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, समाजवादी नेते सुभाष वारे, पुणे महापालिके तील विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या देशात अनेक भाषा आणि प्रांतातील नागरिक राहत असताना देखील आज अखेर देश भक्कम उभा आहे. त्याच प्रमुख कारण हे आपल्या देशाचं संविधान आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या एका नेत्याने संविधान दुरुस्ती च्या नावाखाली संविधान बदलण्याची भाषा केली. यातून त्यांना मूठभर लोकांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न दिसतो आहे. मात्र हा प्रयत्न देशातील जनता स्वीकारणार नाही. असा प्रयत्न करणार्‍याना जनतेने बाजूला केल्याची अनेक देशात उदाहरणे आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली.

यावेळी कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजापर्यंतचाच इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे होता कामा नये तर सगळा इतिहास समाजापर्यंत येण्याची गरज आहे. तसेच आता देशभरात संविधानावर चर्चा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बालवयापासून संविधान शिकवण्याची गरज असून आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर सोहळे होतात. त्यावेळी येणार्‍या प्रत्येक नागरिकाला संविधानाची प्रत द्यावी आणि सर्वांनी संविधान समजून घ्यावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.  ते पुढे म्हणाले की, आपला देश हा हिंदू किंवा मुस्लिमांचा नसून संपूर्ण भारती याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर ते पुढे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल भरण्यास पंपावर गेल्यावर त्याचा भाव आठवतो की रामाची आठवण होते. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

https://www.loksatta.com/pune-news/shivsena-and-bjp-misguiding-people-on-ram-temple-issue-says-sharad-pawar-1795650/