By newseditor on Tuesday, 27 November 2018
Category: पुणे शहर

लक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा

'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

स्टच्या वतीने धनकवडी येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक संयोजक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. संविधान जागृती करण्याचे कार्य केल्याप्रीत्यर्थ प्रा. सुभाष वारे, डॉ. प्रशांत पगारे आणि डॉ. अशोक शिलवंत यांचा सन्मान करण्यात आला. 'संविधानाचा आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील लोकशाही व्यवस्था अजूनही टिकून आहे. सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाच्या मार्गानेच जावे लागणार आहे,'असेही पवार म्हणाले.

संविधान स्तंभाच्या माध्यमातून चांगले संस्कार घडविण्याचा आणि समाजातील ऐक्य टिकविण्याचा प्रयत्न आहे. या स्तंभाच्या धर्तीवर परराज्यातील आणि अन्य पक्षातील खासदारांनीही आपापल्या ठिकाणी स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुळे यांनी दिली.

पंपावर गेल्यावर 'राम' आठवतो का?

विचारांचा मुडदा पाडण्यात आपल्या देशाइतका पटाईत दुसरा देश नाही. संविधानाचे संस्कार घरात, शाळेत मुलांवर कसे होणार? सुरुवातीपासून आपण सारे एक आहोत, हे सांगणारे संस्कार मुलांवर कसे होणार? आपल्याला फार मोठा बदल करायचा असून, आपण परिवर्तनाचे भुकेले आहोत. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आपण 'रामा'वर बोलत आहोत. पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला राम आठवतो की पेट्रोलचा भाव आठवतो, असा प्रश्नही डॉ. आढाव यांनी उपस्थित केला.

पवारांनीच केली प्रोटोकॉलची आठवण

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजकांनी शरद पवार यांचा सत्कार केला. त्यांच्याच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या सत्काराची घोषणा करण्यात आली. मात्र, व्यासपीठावर डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे यांच्यासारखे लोक आहेत. त्यांचा सत्कार आधी करावा, असे पवार यांनी सुचविले. एवढेच नाही, तर पवार यांनी स्वत:हा डॉ. आढाव यांचा हात धरून उभे करून त्यांना सत्कार स्वीकारण्यासाठी आग्रह धरला.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ram-temple-issue-to-turn-the-attention-sharad-pawar/articleshow/66816494.cms