By Editor on Thursday, 16 October 2025
Category: पुणे शहर

[Maharashtra Times]‘पुणे आता सुसंस्कृत शहर राहिलं नाही’, चोरानं दुकानात शिरून केला मोबाईल गायब,

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

पुणे हे अत्यंत सुसंस्कृत शहर मानलं जातं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यामुळे येथील लोक नियमांचं पालन करतील आणि गुन्हेगारी कमी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण पुण्यातही मुंबई किंवा इतर शहरांप्रमाणेच गुन्हेगारी वाढत चालली आहे.

आता हाच व्हिडीओ पाहा ना, एका तरुणानं बघता बघता एका दुकानात चोरी केली आणि पळून गेला. त्यानं महिलेकडून सामान घेतलं आणि नंतर मोबाईल हिसकावून पळ काढला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर संताप व्यक्त करत आहेत.

चोरी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण तरीदेखील काही लोक झटपट पैसे कमावण्यासाठी चोरी करताना दिसतात. हाच प्रकार या व्हिडीओमध्ये घडताना दिसतो. हा व्हिडीओ लोकसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या X अकाउंटवरून पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा चोर दुकानात आला आणि त्यानं दूधाची पिशवी मागितली. दुकानदार महिलेनं त्याला हवं असलेलं सामान दिलं. दरम्यान, त्यानं पैसे देण्याचं नाटक केलं. पाकीट उघडून काही पैसे पुढे केले, आणि संधी मिळताच महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून तो पसार झाला. ही घटना दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, पुणे येथे घडली आहे. अशा चोऱ्या पुण्यातही घडत आहेत, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच या प्रकरणी कठोर पावलं उचलावीत, अशी विनंती पुणे पोलीस आयुक्तांना केली आहे.

या व्हिडीओला ४४ हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय की अशा चोरांचं पोलिसांनी एनकाउंटर केलं पाहिजे, तर कोणी थेट विरोधी पक्षानं सत्तेत असताना काय केलं असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारत आहे. 

Thief Grabs Mobile and Runs Away from Shop in Pune Video Viral | ‘पुणे आता सुसंस्कृत शहर राहिलं नाही’, चोरानं दुकानात शिरून केला मोबाईल गायब, सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल | Maharashtra Times

Leave Comments