By Editor on Friday, 13 October 2023
Category: पुणे शहर

[loksatta]“अजित पवारांच्या २ जुलै आणि पहाटेच्या शपथविधीची कल्पना…”

सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी शब्द फिरवला, भाजपाला डिच केलं. अजित पवारांनी ते बंड केलं नव्हतं तर त्यांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला होता. शरद पवारांनीही भाजपासह जाण्याचं नक्की केलं होतं पण शब्द पाळला नाही.

छगन भुजबळांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार (शरद पार गट) सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी त्यांच्या मुलाखतीत कबुली दिली आहे की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि २ जुलैचा शपथविधी हे दोन्ही निर्णय त्यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतले आहेत. दोन्ही गोष्टी शरद पवारांना न सांगता केल्या होत्या. समाजात अनेकवेळा याबाबत चर्चा होते. परंतु, भुजबळांच्या कालच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे की या दोन्ही गोष्टी शरद पवारांना माहिती नव्हत्या. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही अजित पवारांच्या २ जुलै आणि पहाटेच्या शपथविधीची त्यांना कल्पना नव्हती. हे दोन्ही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतले होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनेक जण शरद पवार यांच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित करतात. परंतु, छगन भुजबळांनी काल स्वतः सांगितलं, 'अनेक वेळा आम्ही शरद पवारांना विनंती केली, आमची आणि भाजपाची चर्चा झाली, मात्र आम्ही निर्णयावर कधीच आलो नाही.' याचाच अर्थ शरद पवार यांनी त्यांची विचारधारा सोडली नाही. शरद पवार त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. मी काँग्रेसची साथ सोडणार नाही, काँग्रेसचा विचार सोडणार नाही, हीच शरद पवार यांची भूमिका कायम होती.

"अजित पवारांच्या २ जुलै आणि पहाटेच्या शपथविधीची कल्पना...", सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य | Supriya Sule says Sharad Pawar was not aware of Ajit Pawar both swearing in ceremony | Loksatta

Leave Comments