By Editor on Friday, 20 January 2023
Category: पुणे शहर

[TV 9 Marathi]मला मोदी यांची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…

सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागतं. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. त्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. या टीकेचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. आमच्या घरावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर बोलून कुणाची प्रसिध्दी होत असेल तर होऊ द्या, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पडळकर यांना नाव न घेता लगावला.

उद्धव ठाकरेच अध्यक्ष

​शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. ते हयात असतानाच त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी नेमले होते. उद्धव ठाकरे हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. स्वत: बाळासाहेबांनी नियुक्त केलेले आहेत. उद्धव ठाकरे अनेक वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात क्राईम वाढला

​उद्योग सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राचा डेटा सांगतो की जगात सगळ्यात जास्त स्टार्टअप आपल्या राज्यात झाले आहेत. हा डेटा सांगतो. पुणे जिल्ह्यात अनेक नवी उद्योग आले आहेत. चाकणमधून कुठलाही प्रकल्प बाहेर जात नाही. आनंद महिंद्रा देखील चाकणमध्ये नवीन प्लांट आणत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यात क्राइम वाढला आहे हे नक्की. कोयता गँगच्या बातम्या आम्ही सातत्याने बघत आहोत. डेटा काय सांगतो हे गृहमंत्र्यांनी पाहावं, असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडी निर्णय घेईल

यावेळी त्यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. कसबा पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं त्या म्हणाल्या. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. बारामतीमध्ये जो कोणी येईल त्याचं आम्ही स्वागतच करतो. आमची संस्कृती अतिथी देवो भव:ची आहे, असं त्या म्हणाल्या.

मला मोदी यांची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी... सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला - i m worried about pm narendra modi, says supriya sule | TV9 Marathi

Leave Comments