By Editor on Friday, 11 April 2025
Category: पुणे शहर

[My Mahanagar]मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो तरीही…; सुप्रिया सुळेंनी टीका करत केली ही मागणी

भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडले आहे. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तसेच रुग्णालयातील प्रशासनावर टीका केली आहे. "दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अशी घटना घडते हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन जातो तरीही त्याच्यावर रुग्णालयाचे प्रशासन काहीच प्रतिक्रिया देत नाही. रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे," असे म्हणत त्यांनी कारवाईची मागणी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिकेत बैठक घेतली. त्यांनी यावेळी बैठकीत मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चर्चा केली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेला इशारा दिला. "खासदार सुप्रिया सुळेंचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या टॅक्स संदर्भात महापालिकेला इशारा दिला आहे. 48 तासात मंगेशकर हॉस्पिटलचा टॅक्स पालिकेने भरून घेतला नाही, तर आंदोलन करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडे महापालिकेची 27 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या प्रकरणावर बोलताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण न्यायालयात असल्याने वसुली थांबवली आहे." असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "सामान्य लोकांनी कर भरला नाही तर त्यांच्या घरापुढे तुम्ही बँड वाजवता. पण या संस्थेने इतक्या कोटींचा कर थकवला असतानाही महापालिका प्रशासन कोणतीच ठोस भूमिका का घेत नाही? सामान्य लोकांसाठी एक न्याय आणि अशा या संस्थेला दुसरा न्याय का लावता?" असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने मंगेशकर रुग्णालयासंदर्भात कराबाबत 48 तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिका मध्ये मी आंदोलन करणार आहे, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. 

Supriya Sule NCP SP on Dinanath Mangeshkar Hospital issue

Leave Comments