खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम
पुणे- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल पहिल्याच दिवशी धायरी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई हे देशातील कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास विषयांवरील प्रमुख संग्रहालयात गणले जाते.
या संग्रहालयात ७०,००० हून अधिक कलाकृती आहेत. यात इतिहासकालीन कलाकृतींपासून ते विविध आधुनिक कलाकृतींचा ही समावेश आहे. हा एक वैश्विक संग्रह आहे त्यात भारतीय आणि विदेशी कलावस्तूंचाही समावेश आहे. गेल्या वर्षी १० जानेवारी २०२२ रोजी या संग्रहालयाला १०० वर्षे पूर्ण झाली. तत्पूर्वी २०१५ मध्ये संग्रहालयातर्फे 'फिरते म्युझियम' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा २ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही सुविधा खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या भागासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आणि काल प्रथमच संग्रहालयाच्या या बस धायरी भागात आणण्यात आल्या होत्या. धायरी येथील डिएसके विश्व, मार्केटिंग ऑफीस परिसर आणि मॅजेस्टिक व्हेनिस सोसायटी या भागात या बस उभा करण्यात आल्या होत्या. यापैकी मॅजेस्टिक व्हेनिस सोसायटीच्या ठिकाणी खासदार सुळे यांनी स्वतः भेट देत या उपक्रमाची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला (शहर) अध्यक्ष काका चव्हाण, परिसरातील विद्यार्थी, पालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महाशिवरात्रीनिमित्त काल शालेय मुलांना सुट्टी होती. त्याचा सकारात्मक उपयोग करून घेत लहान मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखील या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. या बसेस वातानुकूलीत असून त्यांमध्ये कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक शोकेसेस, इंटरअॅक्टिव डेमो किट्स, दृक्-श्राव्य संसाधने आणि डिजिटल माध्यमयुक्त साधनेही उपलब्ध आहेत. या बसेसमध्ये प्रवेश करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी किंवा व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक रॅम्पचीही व्यवस्था आहे. संग्रहालयातील संग्रहित कलाकृतींच्या निवडक प्रतिकृती, त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती, इंटरअॅक्टिव, डिजिटल व स्वतः करून पहावयाच्या अॅक्टिविटीज, ॲक्टिविटी शीटस् व माहिती पत्रकेही होती. हे सर्व पाहून लहान मुले आणि स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. आगामी काळात हा उपक्रम पुण्यातील आपल्या भागात विविध ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न चव्हाण सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी उपक्रमाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय,मुंबई आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.