By Editor on Monday, 16 October 2023
Category: पुणे शहर

[sakal]पुण्यात कारभारी बरेच बदललेत, आता मला पुण्यात काम करावे लागेल - सुप्रिया सुळे

पुणे : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता पुण्यात काम करावे लागेल. आज संघर्ष माझ्या वाट्याला आला आहे, त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही'', अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचा थेट संकेत दिला.

पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्‌घाटन सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, माजी आमदार उल्हास पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी,

रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते. उद्योजक डॉ.संजय मालपाणी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, वन्यजीव छायाचित्रकार स्वागत थोरात,

लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे, लावणी कलाकार रूपाली व दीपाली जाधव परभणीकर यांना "श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.तसेच सामाजिक कार्यकर्ते शिरीष बोधनी यांचाही सत्कार करण्यात आला.

"नगरसेवक नसल्याने माझीही अडचण होत आहे. सरकारने सर्वेक्षण बघायचे सोडून, महापालिका निवडणूका अगोदर घ्याव्यात' अशी मागणी सुळे यांनी केली. त्या म्हणाल्या, ""शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात, पण मी पहिल्यांदाच थेट सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढले.

तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष माझ्या खांद्याला खांदा लावून साथ देत होते. तर कॉंग्रेसचे मातब्बर वकील माझ्या पाठीशी होते.त्यानंतर सलग तीन दिवस देशात कॉंग्रेसच्या नेत्यांसमवेत बैठकांना जात आहे. त्यामुळे नियतीच्या मनात महाविकास आघाडीबाबत काहीतरी चांगले होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.''

NCP Supriya Sule : पुण्यात कारभारी बरेच बदललेत, आता मला पुण्यात काम करावे लागेल - सुप्रिया सुळे | Sakal

Leave Comments