वयाच्या ४० व्या वर्षी माजी सैनिकाने MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश
पुणे – मानवी आकांक्षेपुढे गगन ठेंगणे या म्हणीचा प्रत्यय पुन्हा आला आहे. दौंडमधील एका माजी सैनिकाने भारतीय लष्करात तब्बल १७ वर्षे सेवा केल्यानंतर वयाच्या चाळीशीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लष्करातून निवृत्तीनंतर घरची पारंपारिक शेती न करता अक्षय झुरुंगे यांनी वेगळी वाट चोखाळत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला व एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. अक्षय झुरुंगे यांच्या यशाची परिसरात चर्चा सुरू असून त्यांचे यश स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शक ठरणार आहे. झुरुंग परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत.
झुरुंगे दौंड तालुक्यातील पाटेठाण गावचे रहिवासी आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेऊन खास सत्कार केला.अक्षय झुरुंगे यांनी वयाच्या चाळीसाच्या वर्षी अभ्यास सुरू करून यश मिळवले आहे. त्याआधी १७ वर्षे त्यांनी भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. यादरम्यान त्यांनीलेह, सियाचीन, सिलिगुडी आदी बर्फाळ प्रदेशात सेवा बजावला आहे. ते लष्करातून सुभेदार पदावर निवृत्त झाले आहेत.
निवृत्तीनंतर त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करायची होती मात्र त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला व त्यात यश मिळवले. सध्या ते राज्याच्या परिवहन खात्यात अधिकारी असून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत.