दौंड - उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आला की राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा होतो. राज्याला सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. निव्वळ आरोप म्हणून नाही तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयक आकडेवारी त्यासाठी बोलकी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दौंड शहरातील उप जिल्हा रूग्णालय आणि रेल्वेच्या प्रस्तावित इलेक्ट्रिक कारशेडच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा दावा केला. त्या म्हणाल्या, सुडाचे राजकारण करून विरोधकांना त्रास द्यायचे काम सुरू आहे. घरे आणि पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असल्याने सरकार चालवायला यांच्याकडे वेळ नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपूर ही गुन्ह्यांची राजधानी झाली होती. त्यांच्याकडे कार्यभार आल्यावर कायदा व सुव्यवस्था बाधित होते आणि यंत्रणा कोसळते. पुणे येथे ससून रूग्णालयातून अमली पदार्थ तस्करी करणारा मुख्य सूत्रधार फरार होणे, कैद्यांचा रूग्णालयातील संशयास्पद मुक्काम, मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण, कोयता हातात घेऊन दहशत करणार्यांची वाढती संख्या, दंगल, आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. राज्याला सक्षम गृहमंत्री यांची आवश्यकता असून सध्याची स्थिती पाहता राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रकर्षाने आठवण येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे होते परंतु त्यांनी ते केले नाही. मी नांदेड येथे जाऊन पाहणी केली असता तेथील दृश्य वेदनादायी आहे.
राज्यातील रूग्णालयांमध्ये औषधांचा मुबलक साठा, स्वच्छता आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यापेक्षा सरकार विरोधकांना प्राप्तीकर खाते, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो आणि सक्तवसुली संचलनालय यांच्या माध्यमातून त्रास देत आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सहपालकमंत्री कोणीतरी समजावून सांगा....
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री तथा अर्थ खात्याचे मंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण पुणे जिल्ह्याचे सहपालकमंत्री असल्याची माहिती दिली होती. त्याविषयी विचारले असता खासदार सुप्रिया सुळे यांनी ` मला हे पदच माहित नाही. सहपालकमंत्री म्हणजे काय हे कोणीतरी समजावून सांगावे `, अशी टिप्पणी केली.