राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार कुटुंबिय एकत्र येण्यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या., वैचारिक प्रगल्भता वयाप्रमाणे येत जाते, उगाच केस पांढरे झाले नाहीत?. राजकारण, मतभेद असतातच, पण शेवटी कुटुंब आहे अशावेळी आम्ही एकत्र येत असतो. याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, असे त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणावर बोलताना त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाबाबत या खोके सरकारने ४० दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. आता ४० दिवस होत आले तरी कोणताच निर्णय नाही. ट्रिपल इंजिन सरकारने जुमलेबाजी बंद करावी. आरक्षणाचे काय झाले, याचे उत्तर दिले पाहिजे. आरक्षणासंदर्भात आम्ही कधीही बैठीकाला तयार असल्याचं त्या म्हणाल्या.
राज्यात मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी सुरू आहे. आज पुन्हा संभाजीनगरमध्ये अमलीपदार्थ पकडण्यात आले आहेत. इतकी प्रकरणे बाहेर येत असताना गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्र्यांनी अमलीपदार्थांचे कनेक्शन उघड करणार असे सांगितले होते. ड्रग्ज कनेक्शनमधील नावे सांगा आम्ही पाठिंबा देऊ, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.