दौंड : राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन झाली असली तरी हा कायदा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का ?, हे तपासले पाहिजे. राज्यासमोर प्रचंड आव्हाने असताना आधी जनतेचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेतील सभागृहात पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हे मत व्यक्त केले. माजी आमदार रमेश थोरात व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
लव्ह जिहाद आणि फसवे व जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबविण्यासाठी प्रस्तावित लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य शासनाने राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. याविषयी विचारले असता सुप्रया सुळे म्हणाल्या, राज्यघटनेत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणी कोणाशी लग्न करावे ?, आणि कोणी कोणाशी प्रेम करावे ?, याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कायदा करताना तो राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का ?, हे तपासले पाहिजे. देश त्यांच्या ( सत्ताधारी) मर्जीने नाही तर राज्यघटनेनुसार चालतो. गुन्हेगारी आणि बेरोजगारी वाढत असताना त्याकडे लक्ष दिले पाहिजे..
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दौरा झाला. मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानापासून उद्योगपती सज्जन जिंदाल यांचे निवासस्थान अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. चालत गेले असते तरी करार होऊ शकत असताना जिंदाल उद्योग समुहाशी संबंधित करार डावोस येथे करण्यात आला, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.