केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे निमंत्रण
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या, असे निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना आज दिले. येथील ऐतिहासिक गडकोटांच्या संरक्षण संवर्धनाचा मुद्दाही त्यांनी त्यांच्यासमोर मांडला.
केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी (Union Tourism and Culture Minister Kishan Reddy) यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तसेच लेखी पत्रही दिले. बारामती लोकसभा मतदारसंघातील किल्ले सिंहगड, पुरंदर, राजगड आणि इतर गडकोट पहायला येण्याचे निमंत्रण त्यांनी रेड्डी यांना दिले. बारामती लोकसभा मतदारसंघाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमितील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण संवर्धन व्हावे. यासाठी केंद्र सरकारने काही ठोस कार्यक्रम आखून त्यानुसार कामे करायला हवीत, असे त्यांनी यावेळी रेड्डी यांच्या लक्षात आणून दिले.
इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांबाबतही खासदार सुळे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. हजारो किलोमीटर अंतर पार करून याठिकाणी फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यांच्यासोबतच देशभरातीलही इतर अनेक जातींचे पक्षी याठिकाणी वर्षातील काही महिने मुक्कामाला येत असतात. पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी असते. हे पक्षी पाहण्यासाठीही येण्याचे निमंत्रण खासदार सुळे यांनी त्यांना दिले.
एकूणच बारामती लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक गडकोट, परदेशी पक्षी आणि पर्यटनदृष्ट्या अन्य महत्वाची ठिकाणे पाहून त्या जागा, ठिकाणे अधिकाधिक उत्तम दर्जाची व्हावीत यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही प्रयत्न करण्यात यावेत अशी विनंतीही त्यांना केली. पर्यटन मंत्री आपल्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा विश्वास यावेळी सुळे यांनी व्यक्त केला.