सकाळ वृत्तसेवा : बुधवार, 5 सप्टेंबर 2018
Sharad Pawar Railway Baramati Faltan
बारामती शहर - ‘‘बारामती-फलटण लोहमार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. समजा त्यात अडचण आलीच तर सहा-आठ महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे त्याला फार काही वेळ लागणार नाही,’’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती-फलटण लोहमार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
बारामती-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या ५६ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची चर्चा आज बारामतीत होती.
बारामती-फलटण लोहमार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्त्वाचे स्टेशन होईल. त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल. हे काम सध्या रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी या प्रसंगी दिली.
पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची २२५ कोटींची कामे मार्गी लागली आहेत. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच, बारामती-दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी-२०१९ पर्यंत व्हावे. दौंडचा समावेश पुणे विभागात करून दौंडला बारामतीच्या धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी या वेळी जाहीर केले. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.
ही कामे होणार...जेजुरीत प्लॅटफॉर्मची उभारणी. त्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती
जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅकला मंजुरी
दौंडला रेल्वेच्या जागेत उद्यान विकसित होणार
http://www.esakal.com/pune/sharad-pawar-railway-baramati-faltan-141788