By newseditor on Tuesday, 04 September 2018
Category: बारामती विधानसभा

थोडं थांबा, बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम होत कसे नाही ते पाहतो : शरद पवार








मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

बारामती शहर : येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु.....आणि समजा अडचण आलीच तर तुम्ही सहा आठ महिने थांबा....एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कस काम होत नाही ते....त्या मुळे याला फार काही वेळ लागणार नाही....असे सांगत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आगामी निवडणुकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले.


बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची जोरदार चर्चा आज बारामतीत होती. शरद पवार यांच्या विधानामुळे आता बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम वेगाने मार्गी लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आज बोलताना पवार यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्वाचे स्टेशन होईल व त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे काम रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढून अशी ग्वाही पवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना या प्रसंगी दिली.

सुप्रिया सुळे यांनी रेल्वेचे डीआरएम मिलिंद देऊसकर यांची प्रशंसा करीत त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची 225 कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा देण्याबाबत त्यांनी विनंती केली. बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी 2019 पर्यंत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौंडला बारामतीच्याच धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. दौंडचा समावेश पुणे विभागात करावा असे त्या म्हणाल्या. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.

खालील कामे प्रगतीपथावर

1. जेजुरी येथील प्लॅटफॉर्म उभारणी व त्या नंतर दुस- या प्लॅटफॉर्मची निर्मिती

2. जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅक करण्यास मंजूरी मिळाली आहे.

3.दौंडला रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत होणार

http://www.sarkarnama.in/i-will-ensure-baramati-phaltan-railway-work-done-28261


Leave Comments