By newseditor on Thursday, 06 September 2018
Category: बारामती विधानसभा

ज्येष्ठ नागरिकांनी वयाची काळजी न करता सातत्याने आनंदी राहायला हवे- शरद पवार




सकाळ वृत्तसेवा : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018
Senior Citizens Should Remain Happy Without Worrying About Age Says Sharad Pawar


बारामती- ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची व मायेची अधिक गरज असते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयाची फारशी काळजी न बाळगता सातत्याने आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये सिध्दशिला ग्रुपचे प्रितम राठोड व रवी जैन यांनी उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या सोळा बंगल्यांचे उदघाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे, विलास राठोड, संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, अध्यक्ष मुरलीधर घोळवे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, संभाजी होळकर, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक निवासाला आश्रम अशा शब्दाने संबोधू नये त्या ऐवजी आपण दुसरा कुठला तरी शब्द शोधून काढू असे सांगत या वास्तूला आश्रम असे म्हणू नये, अशी सूचना शरद पवार यांनी केली. मी काय किंवा अरुण गुजराथी काय आम्हाला तुम्ही वयोवृध्दाच्या यादीत टाकून आम्हाला अडगळीत काही टाकू नका, मी आणि अरुणभाई दोघही आता काही निवडणूका लढविणार नाही त्या मुळे आमची चिंता कोणी काही करु नये, झाली तर आमची मदतच होईल, अशा शब्दात पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुहासिनी सातव यांनी आभार मानले.

शरद पवारांनी हास्यकल्लोळात बुडविले....कार्यक्रमादरम्यान एका लेखिकेने पवारांना एक काव्यसंग्रह दिला आणि तोच धागा पकडून शरद पवार यांनी उपस्थितांना अक्षरशः हास्यकल्लोळात बुडविले.....पवारांनी तेथे उपस्थित संबंधित लेखिकेस वय सांगायला अडचण नसेल तर सांगा....असे म्हणताच त्यांनी वय 75 सांगितले...त्यावर त्वरेने पवार उत्तरले...मग आता वय लपवायची काही गरज नाही....(हशा...) 75 व्या वर्षी त्यांनी कविता लिहीली...उद्देशून कोणाला तर प्रियकराला...(पुन्हा हशा) त्यांनी कविताच वाचून दाखविली....शेवटच्या ओळी होत्या.....जिवापाड प्रेम करुनही तुला अजूनही आपले बनवू शकले नाही....पवार म्हणाले म्हणजे अजून दुःख आहे काय...(पुन्हा हशा) कधीतरी तू घालशील मला साद...मीही आनंदाने देईन तुला प्रतिसाद...थोडा पॉज घेऊन पवार म्हणाले वय वर्षे 75.... (प्रचंड हशा) इथे असलेल्या सर्व ज्येष्ठांना मी सांगतो की काही काळजी करु नका आपणही तरुण आहोत...कोणीही येथे वृध्द नाही...

http://www.esakal.com/pune/senior-citizens-should-remain-happy-without-worrying-about-age-says-sharad-pawar-141704
Leave Comments