By Editor on Tuesday, 31 January 2023
Category: बारामती विधानसभा

[the Karbhari]प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय

बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.

रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात. बारामती एमआयडीसीतही अनेक कामगार काम करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. या प्रवासाठी केवळ एस टी बसची सेवा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारामती ते मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी एकदमच लवकर आहे. परिणामी बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत. बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटी ने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागतो.

ही बाब लक्षात घेता प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस पुण्याऐवजी बारामतीहून पहाटे पाच वाजता सोडली, तर ती गाडी पुण्यात तिच्या नियोजित वेळी येईल, आणि बारामती परिसरातील प्रवाशांचाही वेळ आणि खर्चही वाचेल, असा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेणू दुबे यांच्यासमोर रेल्वे खात्याला दिला. त्या म्हणाल्या, 'बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान दोन पैकी एक गाडी सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल व तेथून मुंबईकडे रवाना होईल तसेच मुंबईहून परतताना तीच गाडी बारामतीकडे मुक्कामी आल्यास अनेकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ देखील वाचणार असल्याने ही सेवा लाभदायक ठरेल'

Supriya Sule | प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल - TheKarbhari

Leave Comments