सुप्रिया सुळे यांचे हिंदू जनआक्रोश मोर्चावरुन परखड सवाल
नुकताच पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात लव्ह जिहादपासून अनेक गोष्टींची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बॅनरवर तुम्ही जगायचे कसे? काय खायचे? समाजासाठी काय करायचे? असं लिहिलंय, पण हे सांगणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल केला आहे. "आम्ही रामकृष्णवाले, मनात दिवसभर राम ठेवतो, क्षणभर नाव घेतो आणि सेवेत लोकांच्या दिवसभर राहतो" असा टोलाही बॅनरबाजी करणाऱ्यांना लगावला आहे. खासदार सुप्रिया सुळे बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या.
लोकांनी काय करायचं? हे तुम्ही ठरणावरे कोण? : सुप्रिया सुळे
हरिपाठात हरीचे नाव क्षणापुरते घेतले तरी पुरेसे आहे, असे सांगितले आहे. शिवाय आमचा विठोबा आणि पांडूरंग असा एकच देव आहे, जो सांगतो की, कामे करा, तुम्ही माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुमच्याकडे येतो. हे सगळे चालू असताना पांडूरंगांच्या तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या विरोधात वागताहेत, एक दिवस समाजासाठी द्या, आक्रोश करा, एवढेच नाही तर लग्न कोणी करायची हे ते ठरवू लागले आहेत, असं सांगत लोकांनी काय करायचं? हे तुम्ही ठरणावरे कोण? असा परखड सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
तर मी आणि अजितदादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट काढली असते : सुप्रिया सुळे
असं जर राष्ट्रवादीने ठरवलं तर लोक म्हणतील अजित पवार, सुप्रिया सुळे तुम्ही रस्त्याचे पाहा, आमच्या पोरांची लग्न कोणाशी करायची, हे आम्ही पाहू. एखादा चांगला जावई सुचवला, तर पाहू म्हणतील. तुमच्या घरात स्वयंपाक कोणता करायचा हे सांगितले तर चालेल का? बॅनरवर तुम्ही जगायचे कसे, काय खायचे? समाजासाठी काय करायचे असे लिहीलेय, तुम्ही कोण सांगणार? असा सवाल सुळे यांनी विचारला आहे.
आम्ही रामकृष्णवाले, मनात दिवसभर राम ठेवतो आणि सेवेत लोकांच्या दिवसभर राहतो. म्हणून बारामतीचा विकास होतो. आम्ही काय मॅट्रोमोनीची जाहीरात करीत नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून रोटी, कपडा, मकान, खोलीकरण, रस्ता, सुरक्षेची जबाबदारी ही कामे आमची असली पाहिजेत. कोणाच्या घरात ढवळाढवळ करायची हे काम नाही. हेच करायचे असते, तर अजितदादांनी आणि मी एखादे हॉटेल टाकले असते किंवा मॅट्रीमोनीची वेबसाईट काढली असती, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट उघडली असती..' : सुप्रिया सुळे – News18 लोकमत