By Editor on Saturday, 28 January 2023
Category: बारामती विधानसभा

बारामतीत होणार ईएसआयसी रुग्णालय

संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक​-सुप्रिया सुळे 

 बारामती, ता. २८ : बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

बारामती येथील उद्योजकांच्या बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे खासदार सुळे यांनी आभार मानले.


बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, जेजुरी, इंदापूर या तालुक्यांत मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याबरोबरच शेजारच्या तालुक्यांतील फलटण, माढा व श्रीगोंदा येथेही औद्योगिक वसाहती असून, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बारामती येथे होत असलेल्या ईएसआयसी रुग्णालयाचा लाभ घेता येणार आहे. या सर्व औद्योगिक वसाहतींचा विचार करता सातही वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी बारामती येथे सर्व सुविधांयुक्त ईएसआयसी रुग्णालयाची गरज आहे. इतकेच नाही, तर ते किमान दोनशे बेडचे असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासदार सुळे या गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत होत्या. बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही यासाठी पाठपुरावा सुरू होता.

बारामतीत इएसआयसी रुग्णालय मंजूर झाले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो. एकूण सात औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांची संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव नक्कीच सकारात्मक विचार करतील.
- सुप्रिया सुळे, खासदार

बारामतीतील इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश मिळाले. पंचक्रोशीतील हजारो कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे.
- धनंजय जामदार, अध्यक्ष,
बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

बारामतीत होणार ईएसआयसी रुग्णालय | Sakal

Leave Comments