By newseditor on Tuesday, 03 April 2018
Category: पुरंदर विधानसभा

शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून लवकरात लवकर काम सुरु करावे

पुरंदर विमानतळ आढावा बैठकीस सुप्रिया सुळे यांची उपस्थिती शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून
लवकरात लवकर काम सुरु करावे.

दिल्ली दि. ३ (प्रतिनिधी) – पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. याबरोबरच तेथील पाणी प्रश्न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस त्या उपस्थित होत्या. या विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रमात आहेत. त्यामुळे अलीकडेच त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. या मोर्चातील संख्या लक्षणीय होती. हे पाहता त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना भेटून चर्चा व्हायला हव्यात. शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढून आवश्यक मोबदला मिळेल याची ग्वाही द्यावी लागेल. त्यांतर आवश्यक ते भूसंपादन करून, पाणी आणि अन्य प्रश्न लवकरात लवकर सोडवून विमानतळाचे काम तातडीने सुरु व्हावे, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत व्यक्त केली.

Leave Comments