By Editor on Sunday, 21 May 2023
Category: पुरंदर

[loksatta]“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”

समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा दिवस होता. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.

एकीकडे वानखेडेंची चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. समीर वानखेडेंची कधीकाळी बाजू घेणारे नेते आता शांत आहेत. तर काही नेते आणि ज्यांच्या नातेवाईकांवर वानखेडे यांनी कारवाई केली होती त्यांच्या देखील आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाविरुद्ध कारवाई केली होती. त्यावेळी नवाब मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. नवाब मलिक सध्या तुरुंगात असले तरी त्यांची बाजू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मांडत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, वानखेडेंबाबत नवाब मलिक सातत्याने बोलत होते ते कसं आता खरं व्हायला लागलंय ते बघा. हे सगळं दुर्दैवी आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे हाल होत असतील तर या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पोरांनी काय करावं? मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार आहे. केंद्र सरकारला विनंती आहे की, तुम्ही ईडी, सीबीआय काय वापरता ते वापरता. परंतु लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांवर अन्याय करू नका.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारण इतकंही गलिच्छ होऊ नये असं मला वाटतं. लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर अशा प्रकारचा अन्याय होणं अतिशय चुकीचं आहे, हे सगळं दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राला आणि देशाला लाजवणारी गोष्ट आहे.

"लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर...", समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, "संसदेत..." | Supriya Sule says Whatever Nawab Malik said about Sameer Wankhede came true | Loksatta

Leave Comments