By Editor on Monday, 08 January 2024
Category: Press Note

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न करणार

खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन

पुणे : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे पालक विद्यार्थी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी आणि हवेली तालुक्यांसह खडकवासला विधानसभा मतदार संघातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिकणाऱ्या एकूण १३३ युवती आणि ६७ युवक अशा एकूण २०० तरुणांना यावेळी सुमारे ४५ लाख रुपये इतक्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना या शिष्यवृत्तीचा उपयोग होतो. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आजवर हजारो युवक युवतींना शिष्यवृत्ती देण्यात आली असून ते त्या त्या क्षेत्रात यशस्वी होऊन देशभरात विविध पदांवर कार्यरत आहेत.

शिष्यवृत्ती प्राप्त युवक युवतींना मार्गदर्शन करताना खासदार सुळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या काळात त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी सुद्धा नव्हती. त्याकाळात परदेशात जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले; त्यांच्या त्या कष्टामुळेच तुम्ही आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो असे संविधान त्यांनी निर्माण केले. आपल्या आयुष्यात शिक्षणाचे खुप महत्व आहे. पात्र विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केल्यामुळे ते या शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत, त्यांचे अभिनंदन'

शिक्षणाबरोबरच सामाजिक परिवर्तन देखील झाले पाहिजे. आपण जेंव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतो त्यावेळी समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तो पुढे घेऊन जायला हवा. आपल्या शिक्षणाचा स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला फायदा झाला पाहिजे, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. अनुभव आणि वाचनामुळे आपण समृद्ध होतो. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी वाचन केलेच पाहिजे. यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. त्यामुळे यशाने हुरळून न जाता किंवा अपयशाने न खचता आपले काम चालू ठेवले पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी नमूद केले. 

खासदार सुळे यांनी करून दिली, त्यांच्या लग्नाची आठवण

​खर्चिक आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी असलेल्या प्रथा बंद होणे गरजेचे आहे, असे सांगत सुळे यांनी यावेळी स्वतः त्यांच्या विवाहाची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, 'माझ्या लग्नात पवार साहेबांनी पाहुण्यांना एक पेढा दिला होता. पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी अत्यंत साधेपणाने माझे लग्न केले होते. त्याचे त्याकाळी काैतुक देखील करण्यात आले होते.

Leave Comments