By Editor on Wednesday, 17 May 2023
Category: Press Note

समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे : पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र पाठवले असून तसे ट्विटही केले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर आदी गावांमध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे. नागरीकांना ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असे सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

समाविष्ट गावांत अगोदरच नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीक हैराण आहेत. त्यात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा नागरीकांना आणखी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरीकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave Comments