सविस्तर अभ्यास करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे : चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत आहेत, तरी तातडीने या अडचणी सोडवून चांदणी चौकातील कोंडी फोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले असून तसे ट्विट सुद्धा केले आहे. या चौकाचे काम पूर्ण होऊन दिमाखदार उदघाटन झाले. कोट्यवधी रुपये खर्चून या चौकाचे रुप पालटले, तरी अद्यापही येथील अडचणी दूर झाल्या नसल्याचे वृत्त वारंवार वृत्तपत्रादि माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. याचा दाखला देत खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा सविस्तर अभ्यास करून येथील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.चौकात दिशादर्शक फलक नसल्याने वाहने तसेच पादचाऱ्यांनाही अनेकदा दूरचा हेलपाटा पडत असल्याचे आढळून येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना जागाच उपलब्ध नसल्याने जीव मुठीत धरून त्यांना चालावे लागते. हे पाहता याठिकाणी येत असणाऱ्या अडचणींची राष्ट्रीय रस्ते महामंडळाच्या तज्ज्ञ पथकाकडून पाहणी करावी. तसेच महापालिका आणि पोलीस खाते आणि प्रशासन यांच्या माध्यमातूनही सखोल अभ्यास करुन येथील त्रुटी काय आहेत, त्यांचा सविस्तर अभ्यास करुन त्या तातडीने दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.