By Editor on Thursday, 02 February 2023
Category: Press Note

वयोश्री, ADIP योजनेसाठी खा. सुळे यांनी आंदोलनांनातर घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ADIP आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पुण्यात आंदोलन केल्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज दिले आहे.

दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. ३० जून) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर लागलीच आज त्यांनी दिल्ली येथे सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघात वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी आहेत. त्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून सहाय्यभूत साधने वाटप करायची आहेत. त्यासाठी साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून वितरित करावे, अशी मागणी सुळे या केंद्र सरकारकडे सातत्याने करत आहेत. त्यासाठी त्यांना आंदोलनही करावे लागले.

आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (मंगळवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या. आज या अधिवेशनासाठी आलेल्या सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन सुळे यांनी त्यांना वयोश्री आणि ADIP योजनांबाबत पुन्हा एकदा मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अश्वासन त्यांनी दिल्याचे सुळे यांनी सांगितले
Leave Comments