खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी
दिल्ली, १६ (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एडीप योजनेचे सर्वात चांगले काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असे एकूण एक लाख जणांची तपासणी झाली असून त्यांना योजनेतील उपयुक्त साधनांचे वाटप करायचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना साधने वाटपासाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन सुळे यांनी त्यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन दिले. दिव्यांग आणि वयोश्री योजनांतर्गत गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यात पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली असून दोन्ही योजनांतर्गत एक लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्या सर्वांना उपयुक्त साधनांचे वाटप करायचे आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून आपल्याला विचारणा होत असून गेल्या महिन्यांपासून आपण पाठपुरावा करत आहोत. तथापि या साधनांच्या खरेदीसाठी निधीच नसल्याचे सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात येत आहे, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी वीरेंद्र कुमार यांच्या लक्षात आणून दिली.लाभार्थ्यांची गरज आणि योजनांच्या उपयुक्ततेची निकड लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी कुमार यांच्याकडे केली. या निधीतून लाभार्थ्यांना लवकरात लवकर उपयुक्त साहित्याचे वाटप केले जावे, अशी विनंती त्यांनी या भेटीदरम्यान केली.