By Editor on Thursday, 16 November 2023
Category: Press Note

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी

खासदार सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

पुणे दि. १६ महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी वेळ मिळायला हवा, अशी मागणी केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनसुद्धा या समाजघटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.‌ ही उद्वेगजनक परिस्थिती आहे, असे सांगत आरक्षणाचे हे विषय सभागृहात मांडले जाऊन ते मंजूर होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आरक्षणाचा विषय मांडून त्यावर चर्चा करावी. यासाठी अध्यक्षांनी आगामी अधिवेशनात यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.


Leave Comments