महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले उपाययोजनेचे आश्वासन
पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) - धायरी परिसरातील डीएसके विश्वमधील मेघमल्हार सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. खासदार सुळे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक दिवसांचा हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याचे सांगत सोसायटीच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
खासदर सुप्रिया सुळे यांनी नुकतीच डीएसके विश्वला भेट देऊन सोसायटीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी मेघमल्हार सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न असल्याचे सदस्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पूर्वी या सोसायटीला धायरी आणि किरकटवाडी या दोन ग्रामपंचायतींकडून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत पाणी येत असे. ती वेळ दोन तासांनी कमी झाली आहे. याबरोबरच किरकटवाडी ते डीएसके विश्वपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण केल्यास पाण्याचा अतिरिक्त स्त्रोत मिळेल. तसेच डीएसके विश्वासाठी ज्या विहिरीतून पाणी उपसले जाते त्या विहिरीवर पर्यायी मोटार नाही. परिणामी मोटार मध्ये बिघाड झाल्यास पाण्याची समस्या निर्माण होते. अशा समस्या त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी खासदार सुळे यांच्यासमोर मांडल्या होत्या.
याची तातडीने दखल घेत सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधत ही बाब लक्षात आणून दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी खडकवासला मतदार संघाचे (शहर) अध्यक्ष काका चव्हाण, संदीप चव्हाण यांना महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठक घेण्यात आली असून आयुक्तांनी लवकरात लवकर पाण्याची ही समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पाणी पुरवठा होणाऱ्या विहिरीवर पर्यायी मोटार बसविण्यात येणार असून पाण्याची वेळ सुद्धा वाढविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी पावसकर यांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी लागलीच दिल्या आहेत. या बैठकीला मेघमल्हार सोसायटीचे अध्यक्ष कामते यान यांच्यासह पदाधिकारी किरण मोहिते, सौरभ बेदरकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकारी आशा राऊत यांचीही भेट घेऊन त्यांना नऱ्हे, धायरी, डीएसके विश्व, धायरी फाटा, नांदेड फाटा, किरकटवाडी तसेच खडकवासला भागातील कचरा आणि दुर्गंधीवर उपाय करण्याबाबत विनंती करण्यात आली.