By Editor on Saturday, 16 September 2023
Category: Press Note

भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा

खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भोर : भोर येथे मत्स्य व्यवसायिक ज्याठिकाणी व्यवसाय करतात, त्याठिकाणी भोर नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. असे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून संबंधित मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन टिकायला हवे, अशी मागणी केली आहे. भोर येथील संबंधित जागेवर ते व्यववसायिक गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्याच जागेवर भोर नगर परिषदेने वाढीव प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. परिणामी त्या व्यवसायिकांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन मासे विक्री हाच असून ती जागा गेली तर मासे विक्री करण्यासाठी जागा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

येथील व्यावसायिकांच्या प्रतिनिधीनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मदत करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर सुळे यांनी लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका पदाधिकारी विठ्ठल शिंदे आणि यशवंत डाळ यांना सूचना देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार शिंदे आणि डाळ यांच्यासह काही मत्स्य व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. खासदार सुळे यांचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
Leave Comments