By Editor on Tuesday, 07 July 2026
Category: Press Note

एकाच पावसात सरकारचा फोलपणा समोर

खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका


पुणे : आमचे सरकार इन्फ्रास्ट्रक्चरचे आहे, असे वारंवार सांगितले जाते होते वास्तवात त्यात सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार नसेल तर त्याचा उपयोग काय, एकाच पावसात या सरकारचा फोलपणा समोर आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्य सरकारवर केली.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या हद्दीतील पुणे महापालिका क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विविध कामांच्या संदर्भात आज सकाळी सुळे यांनी पुणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात आणि एकूणच महाराष्ट्रात सुरू असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांवरून राज्य सरकारला घेरले. त्या म्हणाल्या, 'पुणे आणि मुंबई सारख्या शहरात कनेक्टिव्हिटी बंद होणे धक्कादायक आहे. अधिवेशनात आमदार पोहोचतील का नाही? याबाबत शंका आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. ते सगळेच बंद झाले असतील तर त्याचे ऑडिट झाले पाहिजे. कारण सरकारने पर्यावरणाचा विचार केलेला नाही'.

सरकारच्या एकूणच कामगिरीवर टीका करताना खासदार सुळे यांनी, 'हे सरकार ७० वर्षाचा हिशोब मागत आहे, पण यांच्या १२ वर्षाचा हिशोब कोण देणार?', असा थेट सवाल करत राज्य आणि केंद्र सरकारचाही खरपूस समाचार घेतला. पक्ष फोडण्यासाठी या सरकारला वेळ असतो पण सर्वसामान्य जनतेसाठी यांच्याकडे वेळच नाही. सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ठेकेदारांचे लाड करणे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधात असेल तर ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून आपल्या पक्षात घ्यायचे आणि एकदा सत्ताधाऱ्यांसोबत गेले तर तो जो कोणी असेल त्याचे 'सौ खून माफ हे दुर्दैवाने आज देशाचे वास्तव झाले आहे, असा थेट आरोप सुळे यांनी यावेळी केला.

अयोध्या ते उज्जैन या आमच्यासाठी आस्थेच्या श्रद्धेच्या जागा आहेत. तिथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, हे लक्षात घेता आमच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांची अयोध्येला जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत परवानगी मागत आहेत. त्यासाठी त्यांना परवानगी सुद्धा दिली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राम मंदिरासाठी भाजपाच्या एका पिढीने मोठा लढा उभा केला होता. आज त्यांना काय वाटत असेल? सुषमा स्वराज यांची आठवण काढत खासदार सुळे म्हणाल्या, 'सुषमाजी, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या पण आज कोणती मर्यादा या सरकारने ठेवली आहे. त्याच रामाच्या मंदिरात भ्रष्टाचार होत आहे. हा आमच्या श्रद्धेच्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार असून आम्ही तो सहन करणार नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या समोर भ्रष्टाचार मोकळेपणाने सुरू होता, हे दुर्दैवी आहे. यासाठी अडवाणी आणि अटलजींनी संघर्ष केला नव्हता'.

अयोध्येतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करणार आहोत, असे सांगत भाजपला याचे उत्तर भाजपाला द्यावेच लागेल, असे सुळे यांनी यावेळी सुनावले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी गेली २७ वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत; मात्र विलीनीकरणाची कोणतीही चर्चा पक्षात सुरू नाही, असे स्पष्ट केले. 

Leave Comments