खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र
पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.
मुळशी तालुक्यास मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनानी सेनापती बापट यांनी १९२१ या कालखंडात मुळशी येथे शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारे 'मुळशी सत्याग्रह' आंदोलन केले. या मुळशी सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. मुळशी तालुक्यासाठी त्यांचे हे मोठे योगदान आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या प्रकल्पाचे 'सेनापती बापट उड्डाण पूल' असे नामकरण करावे, त्याद्वारे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन त्यांचा लढा प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.पुणे शहराला मुळशी तालुका व परिसरास जोडण्यात या पुलाचा मोठा वाटा असणार आहे. तसेच पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे जंक्शन असणार आहे. हा मार्ग वर्दळीचा असून नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणे तसेच लहान मोठे अपघात या सारख्या समस्यांबाबत खासदार सुळे या सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्र सराकरकडे पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचा महत्वाचा प्रकल्प म्हणजेच चांदणी चौकातील पुलाचे नव्याने काम करण्यात येत आहे, याबद्दल महामार्ग प्राधिकरणाचे त्यांनी आभार मानले आहे.