By Editor on Thursday, 24 August 2023
Category: Press Note

सलग तीन महिने पावसाचे प्रमाण अत्यल्प

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. शिवाय १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. अनेक ठिकाणी तर पाऊस पडलेलाच नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सांगत ट्विट करून सुळे यांनी ही मागणी केली आहे.

पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
Leave Comments