दुधवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
पुणे : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दुधविक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरुन पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
शहरांच्या गर्दीत हरविलेल्या
कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा...!
या बिरुदाखाली खासदार सुळे यांनी स्वतः त्यांच्यासोबत सेल्फी घेतलेला तो फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला अवघ्या तीन तासात साडेसात हजाराहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी तो शेअर देखील केला आहे.
आपल्या मतदार संघातील गावभेटी आणि नागरिकांच्या भेटी घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी अगदी संसदेपर्यंत पाठपुरावा करणे ही खासदार सुळे यांची खास ओळख आहे. या समाजोपयोगी कामाबरोबरच फिटनेसकडेही त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. पहाटेच तयार होऊन त्या नित्यनेमाने फेरफटका मारायला जातात. आज सकाळी मुंबईमध्ये अशाच नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या असता त्यांना एक दूधवाला दिसला.
खासदार सुळे यांनी आवर्जून तेथे थांबत त्या दुधवाल्याशी चर्चा केली. त्याची विचारपूस करून सेल्फीही घेतला. त्यानंतर दुपारी तो फोटो आपल्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केला.
'सकाळी पाच वाजल्यापासून हे कष्ट करतात. प्रत्येकाच्या घरात दूध वेळेवर पोहचावे व त्यांना त्यांचा 'पहिला चहा' वेळेवर मिळावा, त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न असावी यासाठी ते भल्या पहाटेपासून काम करीत असतात. त्यांच्या कष्टाला माझा सलाम!' असा मजकूर लिहून पोस्ट पोस्ट केलेला तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.