By Editor on Monday, 22 May 2023
Category: Press Note

पुण्याचे वैभव बालगंधर्व रंगमंदिराची योग्य ती निगा राखा - खा. सुप्रिया सुळे

नाट्यगृहातील दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावावरून उपस्थित केला सवाल

पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुणे शहराचे 'बालगंधर्व रंगमंदिर ' हे सांस्कृतिक वैभव आहे. पुणेकरांचा हा मानबिंदू तसाच टापटीप आणि स्वच्छ रहायला हवा. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये याची दक्षता घ्यायला हवी, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

बालगंधर्वमधील दुर्गंधी आणि डासांच्या प्रदूर्भावाबद्दल नुकतेच माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून खासदार सुळे यांनी खेद व्यक्त केला आहे. या रंगमंदिराची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेने योग्य ती निगा राखायला हवी, इतकेच नाही, तर त्याचा दैनंदिन आढावा सुद्धा घ्यायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्तांना टॅग करत त्यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व स्व. पु. ल.‌देशपांडे यांनी आग्रहाने ही वास्तू पुण्यात उभा करवून घेतली होती. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी तिचे उद्घाटन केले. हे रंगमंदिर अनेक अद्भुत कलाविष्कारांचे साक्षीदार आहे. म्हणूनच या वैभवाची जपणूक करणे ही समस्त पुणेकरांच्या वतीने महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आहे. कलाकारांच्या ग्रीन रुम्सपर्यंत याचा फटका बसलेला आहे. मुख्य हॉलमध्ये देखील डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचा नाट्य रसिकांना प्रचंड त्रास होतो. स्वच्छता गृहाची तर अतिशय दयनीय अवस्था आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

अलीकडेच येथे एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी याच रंगमंदिराची अगदी लख्ख साफसफाई करण्यात आली होती. हीच तत्परता नाट्यरसिकांसाठी का दाखविता येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुणे शहराचे हे सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि आवश्यक डागडुजीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. कलाकार व रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये याची दक्षता घ्यावी. तसेच शहरातील इतरही रंगमंदिरांच्या साफसफाई व इतर आवश्यक गोष्टींचा दैनंदिन आढावा घेण्याची यंत्रणा सक्रीय करावी, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे. 

Leave Comments