कुंभारगाव-इंदापूरला भेट देण्याचे पर्यटकांना आवाहन
इंदापूर : उजनीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यावर मुक्त विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी ही चालू हंगामातील एक नितांत सुंदर अशी पर्वणीच असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या धरणाकाठी वास्तव्यास आलेल्या या परदेशी पाहुण्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.
खासदार सुळे या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील कुंभारगाव या खास फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध असलेल्या गावाला भेट देऊन त्यांनी बोटीवरून फेरफटका मारत पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. या फेरीदरम्यान त्यांच्यासोबत पक्षीमित्र दत्ता नगरे, तानाजी सल्ले, रोहित, गणेश पानसरे आदी उपस्थित होते. त्यांच्याकडून फ्लेमिंगो पक्षांबद्दल माहिती घेत सुळे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विस्तीर्ण जलाशयावर गुलाबी पांढऱ्या रंगाच्या या पक्षाचे थवेच्या थवे सध्या मुक्त विहार करत आहेत. आकाराने अन्य पक्षांपेक्षा बराच मोठा असलेला हा पक्षी घोळक्याने जलाशयावर विहार करताना त्यांचा विशिष्ट आवाज, आणि तो थवा आकाशात उडताच पक्षीनिरीक्षण करायला आलेली आजूबाजूची मुले, विद्यार्थी आणि पर्यटकांचा एकाच वेळी उठणारा आवाज सध्या कुंभारगावच्या निसर्ग सौंदर्यात जास्तच भर घालत आहे. या ठिकाणी स्वतः भेट देत खासदार सुळे यांनी व्हिडीओ पोस्ट केला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याठिकाणी भेट देऊन पक्षीनिरीक्षणाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही केले आहे.