By Editor on Tuesday, 16 May 2023
Category: Press Note

बियाणे उद्योगाच्या परराज्यात स्थलांतरित होण्यावरून खा. सुळे यांचे सरकारला खडे बोल

पुणे : जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच बियाणे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहे. ही नक्कीच भूषणावह बाब नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आज आंध्र प्रदेशात स्थलांतरित होत असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. याबाबत ट्विट करत खासदार सुळे यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे वैभव असणारा बियाणे उद्योग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील बियाणे उद्योगाला उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जालना जिल्हा हा बियाण्यांची राजधानी म्हणून ओळखला जात होता परंतु आता तशी स्थिती राहिली नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. राज्यात रोजगारनिर्मिती करणारे उद्योग राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे परराज्यात जात असताना बियाणे उद्योग देखील शेजारच्या राज्यात जात आहे ही नक्कीच भूषणावह बाब नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
Leave Comments