By Editor on Saturday, 01 April 2023
Category: Press Note

गुन्हेगारांवर गृहखात्याचा वचक राहिला नाही काय

संजय राऊत धमकी प्रकरणी खा. सुळे यांचा केंद्र आणि राज्य सरकारला रोखठोक सवाल

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून गुन्हेगारांवर गृहखात्याच्या वचक राहिला नाही काय, असा रोखठोक सवाल केंद्र आणि राज्य सरकारला उद्देशून उपस्थित केला आहे.

खासदार संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावरून संतप्त होत खासदार सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केले आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. याशिवाय लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय? असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Leave Comments