By Editor on Friday, 29 September 2023
Category: Press Note

कांदाप्रश्नी राज्य शासन उदासीन आणि असंवेदनशील असल्याचा खा. सुळेंचा आरोप

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या बैठकीस महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांचीच अनुपस्थिती

पुणे : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. हे पाहता कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्र सरकारसमोर जोरकसपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी या बैठकीला जाणे आवश्यक होते. परंतू या बैठकीला ते उपस्थित नसणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे, तर नाहीच उलट कांदाप्रश्नी राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते, असा आरोप सुळे यांनी केला आहे. आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Leave Comments