संपत्तीत महिलांना महत्वाचे स्थान देणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचा केला विशेष गौरव
पुणे : 'आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व समाजात रुळावे' अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेने महिलांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे खास स्वागत करत जिल्ह्यातील तब्बल आठ लाख महिला मालकीनी झाल्याची त्यांनी विशेष नोंदही घेतली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वात अर्थपूर्ण कामगिरीपैकी एक कामगिरी असल्याचा गौरव करत खासदार सुळे यांनी वृत्तपत्रातील एका बातमीचे कात्रण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहे. पुणे जिल्ह्यातील आठ लाख महिलांची घरे त्यांच्या स्वतःच्या नावावर करण्यात आली आहेत.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेत जिल्ह्यात ही महिलांना सन्मान देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. तिला सकारात्मक प्रतिसाद मिळत आजच्या घडीला एक दोन नाही, तर तब्बल आठ लाख महिला घर मालकीणी आहेत, अशी माहिती या वृत्तमध्ये देण्यात आली आहे. ही खरोखरच गौरवास्पद आणि अनुकरणीय बाब असल्याचे सांगत खासदार सुळे यांनी जिल्हा परिषदेच्या उवक्रमाला खास शाबासकी दिली आहे.
याबरोबरच जागतिक स्तरावर आज महिला दिन साजरा केला जात आहे, असे सांगत आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व समाजात रुळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यशस्वी होत आहेत, ही आश्वासक बाब आहे. सर्वांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.