By Editor on Saturday, 23 September 2023
Category: Press Note

धायरी, आंबेगाव नऱ्हे परिसरात घाण, कचरा, खड्डे आणि राडारोड्याची गंभीर समस्या

तातडीने उपाययोजना करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची पालिकेकडे मागणी

पुणे : महापालिका हद्दीतील नऱ्हे, आंबेगाव, धायरी या परिसरात धुळ, घाण, कचरा, राडारोडा, पाण्याचे टँकर, खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे, या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. पालिका आयुक्तांनी या समस्यांची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. वरील परिसरात कचऱ्यासाठी पुरेसे कंटेनर नाहीत. कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा जागोजागी पडलेला आढळतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. परिणामी डासांची पैदास होऊन डेंग्यू, हिवताप या सारख्या साठीच्या आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्यास या मुळे धोका निर्माण झाला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथची व्यवस्था नाही. यामुळे येथे वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यातच सकाळपासून दुपारपर्यंत कचऱ्याच्या गाड्या व पाण्याचे टँकर रस्त्यावरून फिरत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या भागात सकाळी ७ च्या आत महापालिकेमार्फत कचरा व्यवस्थापन व सफाई आदी कामे दररोज होऊन गेल्यास नागरिकांना सोयीचे होईल. महापालिका आयुक्त पुणे यांनी याबाबत तातडीने नागरीकांची सोय लक्षात घेता या मागण्यांवर सरकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा‌, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
Leave Comments