By Editor on Saturday, 18 March 2023
Category: Press Note

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे पुणेकरांसाठी चांगले नाही

सहा हजार झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयास खासदार सुप्रिया सुळे यांचा विरोध

पुणे : विकास हा पर्यावरणपूरक आणि निकोप व्हायला हवा, ही आमची ठाम भूमिका आहे, असे सांगत नदीसुधार प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून सहा हजार झाडे तोडली जाणार असल्याच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे.

शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीची सुधारणा करण्यात येणार असून त्यासाठी नदीकाठची तब्बल सहा हजार देशी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच खासदार सुळे या चांगल्याच संतापल्या आहेत. या निर्णयाला कडाडून विरोध करत त्यांनी ट्विट केले असून आम्ही याचा निश्चितच विरोध करू, असे त्यांनी म्हटले आहे.

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन सहा हजार झाडे तोडणार असेल तर हे निश्चितच पुणेकरांच्या दृष्टीने चांगलं चिन्हं नाही. जी झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडं असून अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध आहे. आम्ही विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन विकास करण्याचा घाट घातला जात असेल तर त्याचा आम्ही निश्चितच विरोध करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Leave Comments