स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपये मंजूर; खा. सुळे यांनी मानले केंद्राचे आभार
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा
पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या फेज १ सुधारीत मार्गिकेस मंजुरी देत या प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो अंतर्गत स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते खडकवासला मेट्रो व्हावी, यासाठी सुळे या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्या केंद्र सरकरकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याबरोबच प्रत्यक्ष भेटी घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.
या त्यांच्या प्रयत्नांना यश येत केंद्राने स्वारगेट ते कात्रज या फेज १ प्रकल्पाला मंजुरी दिली असून२९५४.५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्यात योजना आहे. या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून दिलेल्या वेळेतच हा मार्ग सुरू होईल ही अपेक्षाही व्यक्त केली आहे.