By Editor on Saturday, 07 October 2023
Category: Press Note

कुरकुंभ आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती आणि ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकिकरण करा

खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबरोबरच येथील ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना याबाबत खासदार सुळे यांनी पत्र लिहिले असून तसे ट्वीटही केले आहे. दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुळे यांनी आज (दि. ७)
कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या आरोग्य केंद्राच्या परिसरात त्यांनी वृक्षारोपनही केले. त्या कार्याध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने याठिकाणी ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर देण्यात आला असून त्याचे कामकाज उत्तमरित्या सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कुरकुंभ हे पुणे सोलापूर महामार्गावरील मोठे नगर असून याठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत असल्याने याठिकाणी आरोग्य आणि अन्य सर्वच सुविधा अत्याधुनिक असण्याची आत्यंतिक गरज आहे. असे असताना येथे असलेल्या आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे, असे सुळे सांगितले.

या केंद्रामध्ये आरोग्य सेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काही जागा रिक्त असल्याने कमी संख्येने उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. याखेरीज येथे अधिक तत्पर आरोग्यसेवेसाठी ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या आरोग्यखात्याने याचा सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Leave Comments