By Editor on Friday, 20 September 2024
Category: Press Note

रानकवी ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार प्रदान

मुंबई, १९ सप्टेंबर: ना. धों. महानोर केवळ कवी, कादंबरीकारच नव्हते तर शेती आणि पाणी हे विषय त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या, साहित्य, शिक्षण, संशोधन, शेती, उपक्रम कोणताही असो महानोर प्रत्येक कार्यात पुढे असत, असे गौरोद्गार यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा १९ सप्टेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. रयतेच्या जीवनाशी रोजचा संबंध असलेल्या शेती-पाणी तसेच साहित्य अशा क्षेत्रांविषयी ज्यांना आस्था आहे, अशा लोकांशी नाते जोडण्याचा चव्हाण सेंटरचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.


जैन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री. जैन यांनी 'जे जे उत्तम उदात्त ते ते शोधीत जावे', हे ब्रीद घेऊन जैन उद्योग समूह आपली वाटचाल करीत आहे, असे आपले मनोगत मांडताना सांगितले. कवी ना. धों. महानोर आणि भवरलाल जैन कुटुंबाचा असलेला जिव्हाळा विषद करून त्यांच्यातील ७५ वर्षांच्या स्नेहबंधाचा धांडोळा घेतला.

कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी तर गणेश घुले, औरंगाबाद; महेश लोंढे, बारलोणी, सोलापूर; नामदेव कोळी, कडगाव, जि. जळगाव; आणि प्रदीप कोकरे, मुंबई या गुणवंतांना साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

समारंभाच्या निमंत्रक चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, कविवर्य महानोर आणि पवार कुटुंबामध्ये असलेले चार दशकातील घनिष्ट नाते विचारात घेऊन ना. धों. महानोराचे कार्य पुढे नेण्याचा चव्हाण सेंटरचा प्रयत्न आहे. साहित्यिक म्हणून मराठी साहित्यात महानोरांचं काम अमीट आहे. मराठी भाषेविषयी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण व्हावी, आपल्या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी चव्हाण सेंटर नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉ. आंबेडकर या विभूतींच्या संदर्भातील खऱ्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील पिढीसाठी जाज्वल्य इतिहास सांगणारे साहित्य निर्माण करण्यात येईल.

ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय, चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, जैन फाउंडेशनचे पदाधिकारी, सेन्टरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.

उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सरचिटणीस हेमंत टकले यांनी कवी महानोरांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर श्री. शंभू पाटील व सहकारी यांनी परिवर्तन, जळगाव निर्मित 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हा वारकरी व संतपरंपरेचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर केला
Leave Comments