By Editor on Sunday, 08 October 2023
Category: Press Note

पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

शेतमाल पोहोचविण्याच्या दृष्टीने खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे. मतदार संघातील काही फलोत्पादक शेतकऱ्यांनी सुळे यांची भेट घेऊन याबाबत माहिती देत रेल्वे सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार सुळे यांनी केंद्राकडे ही मागणी केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर, इंदापूर बारामती या तालुक्यात अंजीर, सीताफळ, डाळींब, द्राक्षे आदी फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

या फळांना देशभरातून मागणी असून अमृतसर येथील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. परंतु पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वेगाडी उपलब्ध नाही. यामुळे तेथील बाजारात फळे आणि भाजीपाला पोहोचविण्यासाठी पुणे जिल्हा आणि बारामती परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय अन्य प्रवाशांना देखील गाड्या बदलत जावे लागते, हे खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटमधून निदर्शनास आणून दिले आहे.

पुणे ते अमृतसर अशी थेट सेवा सुरू झाली तर या भागातील सीताफळ, डाळींब, द्राक्षे, अंजीर आदी कृषी उत्पादने थेट तेथील बाजारात पोहोचविता येतील. याखेरीज शीख धर्मीयांना आपल्या पवित्र धार्मिक स्थळाचे दर्शन करण्यासाठीही थेट रेल्वेगाडीने जाणे सोपे होईल, तरी याबाबत सकारात्मक विचार करून पुणे ते अमृतसर थेट रेल्वे सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave Comments