By Editor on Wednesday, 08 March 2023
Category: Press Note

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या

खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे महागाईने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांचे कालच्या आसमानी संकटाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना धीर द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

काढणीला आलेला हरभरा, कांदा, गहू, मका, ज्वारी आदी शिवारातील पिके पावसाने हातची हिरावून नेली आहेत. याशिवाय केळी, द्राक्षे, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव देखील झाला आहे. राज्यातील शेतकरी हताश आणि निराश आहे.

अशा परिस्थितीत एकीकडे महागाईचा कहर आणि दुसरीकडे हातचे चलन नष्ट झाले अशी स्थिती असताना पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या नुकसानीचे पंचनामे वेळेत पुर्ण करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 
Leave Comments