By Editor on Monday, 05 June 2023
Category: Press Note

पहिल्याच पावसात पालखी मार्गाची दुरवस्था

तात्पुरती मालमपट्टी नको; खासदार सुळे यांची आठवड्यात दुसऱ्यांदा दुरुस्तीची मागणी

पुणे : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर आला असताना या रस्त्याची ही अशी अवस्था झाली असून तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे.पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला तरी या रस्त्याची कामे अतिशय संथ गतीने येथे काम सुरु आहेत. मतिमिश्रित मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करू नये, उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी गेल्याच आठवड्यात सुळे यांनी केली होती. त्यातील तथ्य कालच्या पहिल्याच पावसात लक्षात आले असून खड्ड्यात भरल्या गेलेल्या मतिमिश्रित मुरुमामुळे जागोजागी चिखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा गडकरी यांना आठवण करून दिली आहे. पालखी सोहळ्याच्या काळात वारकरी व नागरीकांची सोय लक्षात घेता हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Leave Comments